धाराशिव (प्रतिनिधी)-अत्यंत तुटपुंज्या निवृत्तीवेतनावर उपजीविका चालविणाऱ्या वयोवृद्ध इपीएस-95 पेन्शनधारकांनी सोमवारी (दि.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील इपीएस पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोदी है तो गॅरंटी है असे देशाचे पंतप्रधान सांगत असले तरी इपीएस कर्मचाऱ्यांना ही गॅरंटी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे देशातील 187 कंपन्यांमधील 75 लाख कर्मचारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, आमचा हक्क आमची पेन्शन घेऊनच राहू असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक या मार्गावरुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी बोलताना इपीएस-95 निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत थोरात म्हणाले की, इपीएस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली देशभरात लढा सुरु आहे. इपीएस कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहील, असेही ते म्हणाले. संघटना पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आपली भूमिका मांडून सरकारला पेन्शन द्यावीच लागेल, असे ठणकावून सांगितले. मागील गेली 10 वर्षापासून सर्व खासदारांच्या मार्फत मागण्या माडण्यात आल्या परंतू याची दखल घेतली नाही तसेच देशपातळीवर राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी खासदार  हेमा मालिनी यांचेसह दोन वेळा पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष सविस्तर भेट घेवून पेन्शनवाढी संबंधी चर्चा केली व आपली मागणी योग्य असून लवकरच आपल्या मागण्या मान्य करणार असल्याचे अश्वासित केले मात्र अद्याप पर्यंत मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही तरी आचारसंहिते पूर्वी आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढे राजकीय संघर्ष अटळ असून त्याची प्रत्यक्ष कारवाई येत्या काळात दिसून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. इपीएस-95 पेन्शनधारकांना किमान निवृत्तीवेतन 7500 रुपये अधिक निर्वाह भत्ता देण्यात यावा, प्रत्यक्ष वेतनावर उच्च पेन्शनचा लाभ मिळावा, पती-पत्नीस मोफत उपचाराची सुविधा मिळावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या आंदोलनात इपीएस-95 निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक डी. एम. पाटील जिल्हाध्यक्ष चंद्रकांत थोरात, सचिव बी.के.शिंदे,बी.एस.गरड, अर्जून धुर्वे, विष्णू जाधवर, बाळासाहेब देशमुख, बबन सरवदे, आबा पाटील, यशवंत पेठे, हनुमंत बोचरे, उत्तम जाधव, विश्वंभर पाटील बी.एस.काकडे, साहेबराव भिंगडे, भारत लबडे,आय.एस निंबाळकर, नागनाथ काळे, रामेश्वर शेंडगे, अफजल काझी, अनंतराव पडवळ, अनंत मगर यांच्यासह वयोवृद्ध इपीएस-95 पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top