धाराशिव  (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता आज धाराशिव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील हॉटेल अँपल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद - 2024 चे आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये जिल्ह्यात नव्याने स्थापित होणाऱ्या 43 उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्यामधून जिल्ह्यामध्ये 933 कोटीं रुपयांची गुंतवणूक होवून सुमारे 6124 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

 या परिषदेच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर विभागाचे येथील उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते होते. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे,जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयाला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही गुंतवणूक परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन,खादी ग्रामोद्योग कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एन.पी. जावळीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top