उमरगा (प्रतिनिधी)-औसा नाथ संस्थानच्या परंपरेनुसार 227 वर्षापासुन सुरु असलेला नाथषष्ठी उत्सव यंदा महाराष्ट्र-कर्नाटक सिमेलगत असलेल्या अलगुड (ता. बस्वकल्याण) येथे 27 मार्चपासुन सुरु होत आहे. 

नाथषष्ठीची परंपरा औसेकरांच्या घराण्यात आली, जी आजतागायत निष्ठेने जोपासली जात आहे. जवळपास 226 वर्षापासून हा नाथषष्ठी महोत्सव श्रद्धेने, निष्ठेने प्रत्येक वर्षी वेग वेगळ्या राज्यात ठिकाणी साजरा होतो. पहिला नाथषष्ठी महोत्सव सद्गुरू वीरनाथ महाराजांनी लोहगाव (पुणे) येथे केला होता. 

आत्तापर्यंत काशी, रामेश्वर, गाणगापुर हैद्राबाद, कर्नाटक व मराठवाड्यातील विविध शहरात, गावात तेथील वारकरी, शिष्य,भाविकांचे निमंत्रण अयोजनानुसार नाथषष्ठी उत्सव होतो, म्हणून याला “फिरता उत्सव” म्हटले जाते. या वर्षीचा म्हणजे 227 वा श्री नाथषष्ठी महोत्सव संस्थानचे पाचवे पिठाधीपती सद्गुरु श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली व सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकात बिदर जिल्हामध्ये बसवकल्याण तालुक्यातील अलगुड येथे 27 मार्च ते तीन एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे. 

या कार्यक्रमात पहाटे काकडा, श्री विष्णूसहस्त्रनाम, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, श्रीनाथ स्थापनेची पुजा, मल्लनाथ गाथ्यावरील भजन, आरती, दिंडी, महाप्रसाद, हरिपाठ, चक्रीभजन, कीर्तन व हरिजागर असा दैनिक कार्यक्रमाचे नियोजन आहे, यात सद्गुरु श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांचे दररोज सायंकाळी सहा ते साडेसात वेळात चक्रीभजन होणार आहे. नाथषष्ठी किर्तन महोत्सवामध्ये बुधवारी (ता.27) गुरूभक्त श्री माधव महाराज स्वामी सलगरकर यांचे गुलालाचे किर्तन होईल. गुरुवारी (ता.28) योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांचे रात्री किर्तन होईल. शुक्रवारी (ता.29) श्री. एकनाथ महाराज हांडे (पंढरपूर), शनिवारी (ता.30) गुरुबाबा महाराज औसेकर, रविवारी (ता.31) शरदचंद्र महाराज देगलूरकर, सोमवारी (ता.1 एप्रिल) गहिनीनाथ महाराज औसेकर, मंगळवारी (ता. 2 ) चैतन्य महाराज महाराज देगलुरकर यांचे रात्री किर्तन सोहळा होणार आहे. 

या नाथषष्ठी महोत्सवाची सांगाता दहीहंडी फोडुन, गोपाळकाला वाटुन केली जाते. या नामसंकीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नाथ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top