धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील अवधुतवाडी येथील गर्भवती महिलेला कुत्रा चावल्यानंतर रेबिज लस देण्याऐवजी दुसरेच इंजेक्शन देण्याच्या प्रकार दहीफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला. याप्रकरणी महिलेल्या पतीने तक्रार दिल्यानंतर दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. तर एका नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसचे आरोग्य सेवकालाही निलंबित करण्यात आले आहे.

अवधूतवाडी येथील पुनम नितीन अवधूत यांना रविवारी कुत्रा चावला होता. त्या दहिफळला रेबिज लस टोचून घेण्यासाठी आल्या होत्या. सुरूवातीला त्यांना गर्भवती असल्याने लस देता येत नसल्याचे सांगत धाराशिवला पाठवण्यात आले होते. धाराशिवच्या महिला रुग्णालयात लस दिल्यावर पुढील उपचार दहिफळ येथे घेण्यास सांगण्यात आले. मात्र त्यावेळी तेथे नियुक्त करण्यात आलेले दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व नियमित वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. तेव्हा आरोग्य सेवक यांनी त्यांना चुकीची इंजेक्शन दिले. यामुळे पुनम यांना त्रास होवू लागला. त्यांना तातडीने उपचार मिळाल्यामुळे काही अपाय झाला नाही. याप्रकरणी पती नितीन अवधूत यांनी तक्रार केली. याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी गांभिर्याने दखल घेतली. कंत्राटी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याचा निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे पाठवण्यात आला. आरोग्य सेवकालाही निलंबित करण्यात आले आहे. गर्भवती मातेची प्रकृत्ती स्थिर आहे.


 
Top