धाराशिव (प्रतिनिधी)-महावितरणची चालू व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम सुरू झाली असून उन्हाची तिव्रताही  दिवसेंदिवस वाढत आहे. मार्चच्या रखरखत्या उन्हाळयात गारवा हवा असेल तर आपले थकीत वीजबील त्वरीत भरा अशी आर्त हाक महावितरणने जिल्हयातील वीजग्राहकांना घातली आहे. गेल्या 15 दिवसात केवळ 44  टक्केच वसुली झाल्याने उर्वरीत 14 दिवसात महावितरणला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत बीजबीलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

फेब्रुवारी अखेर 409 कोटी 63 लाख रूपयांची थकबाकी असलेल्या धाराशिव मंडळासाठी वरिष्ठ कार्यालयाने लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील वीजबील वसुलीसाठी मार्च महिन्याचे चालू बिलाच्या मागणीसह 35 कोटी 44 लाख रूपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.  या लक्ष्याचा पाठलाग करत मागील 15 दिवसात केवळ 15 कोटी 70 लाख रूपयांची वीजबील वसुली झालेली आहे.  हे प्रमाण खूपच कमी असून येणाऱ्या 14 दिवसात उर्वरीत 19 कोटी 74 लाख रूपयांची वसुली होणे महावितरणसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. वसुलीसाठी परिमंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी दारोदार फीरत आहेत, मात्र जिल्हयातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे भर उन्हाळयात वीजपुरवठा खंडीत करण्याशिवाय महावितरणसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. वीजबील न भरल्यामुळे 759 वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर 262 वीजग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

 धाराशिव मंडळातील तूळजापूर विभागांतर्गत 15 कोटी 40 लाखाचे लक्ष्य असून कालपर्यंत 6 कोटी 77 लाख रूपये वसुली झाली आहे. तर धाराशिव विभागांतर्गत 20 कोटी 4 लाखांपैकी केवळ 8 कोटी 93  लाखांची वसुली झाली आहे. 


मार्च महिन्यातील वीजबील वसुलीचे निर्धारीत लक्ष्य पुर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी रणरणत्या उन्हात वीजबील वसूलीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनीही माझे बील माझी जबाबदारी याप्रमाणे वीजबील भरावे. उन्हाची दाहकता लक्षात घेवून अखंडीत वीजपुरवठा मिळवण्यासाठी महावितरणचा कर्मचारी घरी येण्याची वाट न पाहता वीजबील भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा वापर करत वीजबील भरावे व नामूष्की टाळावी  सुंदर लटपटे, मुख्य अभियंता, लातूर परिमंडळ.


 
Top