तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शिवजयंती  निमित्ताने सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी  श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर भवानी तलवार अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. 

छत्रपती श्री.शिवाजी महाराज जयंती निमित्त सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी शोभन नाम संवत्सरे शके 1945 आज माघ शुक्ल 10 दशमी दिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर 'भवानी तलवार अलंकार“ महापूजा मांडण्यात आली होती. या पुजे बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते कि, स्वराज्य निर्माण करण्यासाठी  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली. त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा प्रतिवर्षी बांधली (मांडली) जाते. तसेच श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदिरात छञपती शिवाजी महाराज मुर्ती प्रतिष्ठापना विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या हस्ते प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी, धार्मिक सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या उपस्थितीत विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 

छत्रपती शिवाजी चौकात शिवप्रेमींची मंदियाळी

येथील शिवाजी चौकात छञपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा येथे पहाटे पासुन राञी पर्यत अभिवादनासाठी रीघ लागली होती. सकाळी घरोघर छञपती शिवाजी महाराजांच्या छोट्या मुर्तीचे पुजन करुन घरावर भगवा झेंडा लावण्यात आले. तर शहरात चौका चौकात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवमुर्तीची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. शिवजयंती निमित्ताने शिवसप्ताह निमित्ताने सप्ताहभर रक्तदान, आरोग्य शिबीर, अन्नदान सह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, सिंदफळ, आपसिंगा, मंगरुळ, तामलवाडी, काटगाव, इटकळ, शहापूर, जळकोट, अणुदर भागात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली गेली.


 
Top