भूम (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे सकल मराठा बांधवांचे दोन दिवसापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थात हे आंदोलन दोन दिवसापासून सुरू आहे. 

या संदर्भामध्ये माहिती अशी की सकल मराठा समाज बांधवांनी भूम शहरामध्ये गोलाई चौकात चक्काजाम केले आहे. शहरात मुख्य रस्ता असणारा गोलाई चौकात सकल मराठा बांधवांतर्फे आंदोलन करण्यात आले असून यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय बिघडत चालली असल्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाज युवकांनी भाषणे करताना पाटील हे आमच्या भावी पिढीसाठी उपोषण करत असून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. आता मराठा समाजाची प्रॉपर्टी आहेत त्यामुळे त्यांच्या केसाला धक्का लागला तरी सरकारमधील एकही नेत्याला रस्त्यावर तर दूरच घरात जाऊन समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. अशा माणसाला जर काही झालं तर या शासनाला आम्ही सोडणार नाही. असे सांगत रास्ता रोको आंदोलन केले आहे. 

भूम तालुक्यातील अंतरगाव येथे महादेव गोरे हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत.यावेळी कोल्हापूर ते कुंतलगिरी वाहतूक धाराशिव ते अहमदनगर वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली. उसाचे कारखाने राजकीय लोकांचे असल्यामुळे त्यांना याची झळ पोहचावी आणि त्यांनी तात्काळ मराठा समाज बांधवांच्या हिताचे पाऊल उचलावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी उसाची वाहतूक करणारे सर्व वाहने रस्त्यावरच अडवून धरले आहेत. यावेळी भूमचे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयवंतराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी आदी प्रशासकीय लोकांनी रास्ता रोको स्थळी येऊन मराठा समाज बांधवांशी रास्ता रोको थांबण्याविषयी विनंती केली. मात्र सकल मराठा समाज बांधवांनी पाटील यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही विचार करू असा शब्द दिला आहे. आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा समाज बांधवांना आंदोलन शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन करीत होते.


 
Top