धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. धाराशिव पालिका प्रशासनाने सात दिवसात कत्तलखाने बंद करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. पालिका प्रशासन, पोलिस व तहसील विभागाच्या पथकाने शहरातील तीन कत्तलखान्यावर बुलडोजर फिरवला. तर परंडा शहरातील विविध भागातील पाच अवैध कत्तलखाने तगड्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. 

धाराशिवमधील खिरणी मळा परिसरातील कत्तलखाने सुरू होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे परिसरातील कत्तलखाने बंद करण्याची मागणी नागरिकांतून होत होती. पालिका प्रशासनाने कत्तलखाना चालकांना कत्तलखान्याचे साहित्य काढून घेण्याबाबत नोटीसा दिल्या होत्या. पोलिस बंदोबस्तात कत्तलखान्यांवर जेसीबी फिरवून काही क्षणात कत्तलखाने जमीनदोस्त केले. कत्तलखान्याचे बांधकाम पाडण्यात आले. तर पत्रा शेड काढून टाकले. आजवरची ही जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. यावेळी धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे, अधिकारी व कर्मचारी हजर होते. 

परंडा शहरात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठयांच्या मार्गदर्शनात तहसीलदार घनश्याम अडसूळ, मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या संयुक्त पथकाने जेसीबीने शहरातील विविध भागातील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त केले. यावेळी पोलिस मुख्यालयातील विशेष कृती दलाच्या जवानांसह अधिकारी व पोलिस अंमलदारांच्या बंदोबस्तात कत्तलखाने पाडले. 


 
Top