भूम (प्रतिनिधी)-कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम भूम तालुक्यात चालू असून, आठ गावातील शेतकऱ्यांनी रामेश्वर व गोरमाळा तलावात या जाणाऱ्या पाईपलाईन मधून पाणी सोडण्याची तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी हे चालू काम बंद पाडले. 

मराठवाडा कृष्णा उपसा सिंचन योजनेचे हिवर्डा तलाव ते सोनगिरी तलाव या उपसा सिंचन योजनेची पाईपलाईनचे काम सध्या वरुड, बऱ्हाणपूर, गोरमाळा, कासारी, कृष्णापुर रामेश्वर,वरूड या भागातून जाते. परंतु या आठ गावांना रामेश्वर व गोरमाळा तलावात पाणी सोडले. तर या आठ गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे रामेश्वर गोरमाळा तलावात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील जाणाऱ्या पाईपलाईन मधून या दोन तलावांमध्ये पाणी सोडण्याची तरतूद करण्यात यावी अन्यथा हे काम चालू करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी अविनाश चोरमुले, आबा पिंगळे, बापू नलवडे, तात्यासाहेब दराडे, अतुल शेळके, अमोल अवताडे, सुभाष अवताडे, सतीश वारे, तानाजी पाटील यांच्यासह या भागातील शेतकरी उपस्थित होते.


आम्ही सर्व शेतकरी मिळून कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे जाणाऱ्या पाईपलाईन मधून रामेश्वर गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरतूद करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. परंतु अद्यापही आमची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी मिळून हे पाईपलाईनचे काम आज बंद केले.

तानाजी पाटील, तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना.


सध्या भूम तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळ जाणवत आहे यामध्येच कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेची कामे जलदगतीने पुर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. योजनेची सर्वच कामे जलद गतीने चालू असून हे काम सुरु राहणे करिता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. आम्ही गोरमाळा व रामेश्वर या तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला असून शासनाने मंजुरी दिल्यानंतर या तलावामध्ये पाणी सोडणे शक्य होणार आहे.

प्रवीण चवरे, कार्यकारी अभियंता उपसा विभाग धाराशिव.

 

 
Top