धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने संधी दिल्यास धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकरी, तरुणांसाठी गेमचेंजर ठरणारा दुग्ध प्रकल्प वर्षभरात जिल्ह्यात साकारणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे दावेदार बसवराज मंगरुळे यांनी रविवारी (दि.25) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.खंडेराव चौरे उपस्थित होते. पुढे बोलताना मंगरुळे म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघातील गावे पिंजून काढली आहेत. लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना शेती, उद्योग, रोजगार या क्षेत्रात काम करण्याची मोठी गरज लक्षात आली. यातूनच आपण संधी प्राप्त झाल्यास येत्या वर्षभरात अमूल, सुमुलच्या धर्तीवर मोठा दुग्ध प्रकल्प उभारणार असून यामधून शेतकरी व तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले.

गावागावातील शेतकरी, तरुणांशी बोलताना त्यांच्या गरजा आपण जाणून घेतल्या. यामधूनच आपण आपल्या कामाची दिशा निश्चित केली. संधी मिळाल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत या उपक्रमाचा आधार घेत येथील बेरोजगार तरुणांना मालक बनविण्याचा आपला निर्धार आहे. यासाठी अमुल, सुमुल तसेच बनारस येथे असलेल्या मोठ्या दुग्ध प्रक्रिया उद्योगांची मदत घेऊन धाराशिव जिल्ह्यातही असा प्रकल्प येत्या वर्षभरात उभा करणार आहोत. बनारस येथील दुध प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे दररोज 1 कोटी लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. त्यांच्या 1 रुपये उत्पन्नातील 82 पैसे इतका वाटा दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो. अर्थात येथील तरुणांनाही दुध उत्पन्नाचे व्यवसाय आपण उभे करुन देऊ. जेणेकरुन त्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढेल. ते व्यावसायिक, मालक बनू शकतील. यामध्ये भाजप तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही सामावून घेणार आहोत. यातून त्यांनाही सन्मानजनक व्यवसाय, उद्योगाचे भागीदार होता येईल.

छत्रपती संभाजीनगर येथील अनेक यशस्वी उद्योजक, कारखानदारांशी आपले सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा धाराशिव मतदारसंघातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना नक्कीच मिळवून देऊ. तसेच त्यांच्या माध्यमातून येथे उद्योग उभारणीसाठी गुंतवणूक आणण्याचाही आपला मानस आहे. आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या खिळ्यापासून ते बंदुकीच्या गोळ्या, रेल्वे व अन्य वाहनांचे पार्ट तसेच इतरही शेकडो वस्तू निर्मिती करणारा फोर्जिंग मशिनिंग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणण्याचा आपण निश्चय केला आहे. याद्वारे रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

मतदारसंघातील माजी सैनिक तसेच इतरही कुशल, अकुशल तरुणांना सोबत घेऊन सेवा क्षेत्रातील व्यवसाय उभा करणे व त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हेही आपले ध्येय असून संधी मिळाल्यास ते लवकरच आपण साकारुन दाखवू, असा विश्वास श्री.मंगरुळे यांनी व्यक्त केला. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या जीवनात हा अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी येथील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीची तसेच जनतेच्या आशीर्वादाची गरज असून यासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे, असे आवाहनही त्यांनी केले.


 
Top