तुळजापूर (प्रतिनिधी)- तरुणांनी सोशल मीडियाच्या स्वप्न नगरीतून बाहेर पडणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, धाराशिव डॉ. पौर्णिमा दागडीया यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने 'आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अडकलेली पिढी -सुरक्षितता व उपाय' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

त्या पुढे बोलताना डॉ. दागडीया म्हणाल्या की, आज सोशल मीडिया म्हणजे आधंळ्यांच्या विश्वात आधंळ्यांनी सुई शोधण्याचा प्रकार आहे. आज निश्चित भारत विकास करत आहे, पण हा विकास शहरी भागात दिसून येत आहे. ग्रामीण भाग आजही विकासाची वाट पाहत आहे. सोशल मीडिया एखाद्या ठिकाणी पोहचणे म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्याचा योग्य वापर कसा करायचा आहे याचे देखील समाजाला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आपले लोक सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अमिषाला बळी पडत आहेत. सोशल मीडिया हे एक गोड विष आहे ही बाब आपण समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः महिलांनी ही बाब समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी आपले कौतुक होत असेल तर धोका आहे हे लक्षात घ्यावे. ऑनलाईन मार्केटिंग करत असतानाचे धोके देखील लक्षात घेणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. यशवंतराव डोके यांनी विचार व्यक्त केले. यावेळी आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ.एन.बी.काळे, महिला सक्षमीकरण विभागाच्या सदस्य डॉ.एफ.एम.तांबोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख प्रा.डॉ. सी.आर दापके यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. डब्ल्यू गुंड यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.एस.सी. वसावे यांनी मानले.


 
Top