धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाने ज्यांना पक्षाने भरभरून दिले. तेवढेच प्रेम जनतेने दिले, तरीही ज्यांनी पक्ष सोडून धाराशिवच्या मतदार बांधवांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध राहून पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे.

जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, धाराशिव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि यापुढेही कायम राहील. जिल्ह्यातील काँग्रेसचे काही लोक स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. परंतु कार्यकर्त्यांनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, खा. राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जोमाने पक्षबांधणी करून काँग्रेस पक्षाचे विचार जनतेपर्यत पोहचवावेत. धाराशिव जिल्ह्याचे नेते तथा माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण जिल्ह्यात दौरे करून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची  बांधणी करणार आहोत, असेही शेरखाने यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


 
Top