धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव वेगाने बदलत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण प्रकल्प निर्णायक टप्प्यात पोहोचले आहेत. धाराशिव शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शहरवासीयांसोबत चर्चा करून काही महत्वाचे विषय निश्चित केले होते. अनेक वर्षांपासून असलेल्या या सगळ्या मागण्या मार्गी लागल्या आहेत. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, आण्णाभाऊ साठे स्मृति उद्यान आणि शादीखान्यासाठी प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी व्यायामशाळा, लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ई-लायब्ररी व अद्ययावत अभ्यासिकेसाठी एकूण तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी सहा कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा शासन आदेश निघाला आहे. या सर्व मूलभूत कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.


शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अतिशय कमी जागा आहे. त्यामुळे जयंती, महापरिनिर्वाण दिन, बुद्ध जयंती, संविधान दिन आदी कार्यक्रमावेळी भीम अनुयायांची मोठी अडचण होते. रहदरीचीही मोठी अडचण या कालावधीत सहन करावी लागते. शहरातील नागरिकांनी पुतळ्याच्या दक्षिणेला असलेली जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध करून देऊन त्याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भव्य असे सभागृह बांधून देण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबत आमदर पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा चालू ठेवला होता. त्याला यश मिळाले असून एक कोटी रुपयांचा निधी अद्यावत सभागृहासाठी मंजूर झाला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला व्हावी यासाठी भव्य असे स्मारक करण्यासाठी देखोल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठे परिश्रम घेतले. शहरातील शासकीय दूध डेअरीच्या जागेत सदर स्मारक प्रस्तावित आहे. या ठिकाणी अण्णाभाऊंच्या नावाने स्मृती उद्यान करण्यासाठी देखील एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच अण्णाभाऊंच्या उचित स्मारक उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांच्या दर्ग्याजवळ ईदगाहनजीक शादिखाना उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत आमदार पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. तसेच शहरात महिलांसाठी दोन स्वतंत्र व्यायामशाळा आणि लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हा निधी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध करू शकलो. याबाबत मोठे समाधान वाटत असून त्याबाबत आपण त्यांचे आभार मानत असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.


 
Top