धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह व पक्ष हा संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे असताना देखील निवडणूक आयोगाने भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा काळा व दुदैर्वी निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकशाहीस अत्यंत घातकी व संविधानाला पायदळी उडवणारा असून भाजप-धार्जिन्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कृती पुतळ्यासमोर काळ्या पट्ट्या बांधून गुरुवारी (दि.8) आंदोलन करण्यात आले.

निवडणूक आयोगाने कोणतीही सत्यता पडताळून न पाहता फक्त औपचारिकता दाखवित सुनावणी घेतली. तसेच दि.6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असून त्यांना चिन्ह देखील बहाल करण्याचा अत्यंत दुदैर्वी व लोकशाहीसाठी घातक निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो....भाजप धार्जिण्या निवडणूक आयोगाचा धिक्कार असो, संविधान बचाओ, देश बचाओ... संविधान जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये विठ्ठल माने, वाजिद पठाण, मनोहर हरकर, डॉ गोविंद जोगदंड, शेखर घोडके, मनिषाताई राखुंडे, नानासाहेब जमदाडे, इक्बाल पटेल, बालाजी डोंगे, अनिल जाधव, गणेश गडकर, जीवनराव बर्डे, बाळासाहेब कणसे, डॉ ताडेकर, श्यामसुंदर पाटील, ॲड प्रवीण शिंदे, प्रमोद शिंदे, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब जाधव, नानासाहेब नलावडे, अशोक भिरंजे, अप्पासाहेब पडवळ, रणवीर इंगळे, रमेश गादेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top