धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा पोलीस दलाला लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल विलास कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्याच्या वृक्ष लागवड चळवळीत मोठे कार्य केलेले आहे. त्याचबरोबर आदिवासी, पारधी समाजातील गुन्हेगारांचे आर्थिक पुनवर्सन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यासह उपलब्ध असलेल्या जागेत वृक्ष लागवड केली. महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड चळवळीत त्यांनी स्वतः सहभाग घेऊन तसेच विविध सामाजिक संस्था, जसे की टाटा सामाजिक विज्ञान संस्था, कोहिजन फाऊंडेशन, श्री श्री रविशंकर अध्यात्मिक केंद्र, तसेच महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रीय शेती उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आहेत. शेतकरी ते थेट ग्राहक असा प्रवास शेती उत्पादनात त्यांनी केला असून आज हजारो शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला आहे.

आदिवासी, पारधी समाज जो गुन्हेगारी जमात म्हणून ओळखला जातो, त्या समाजाला गुन्हेगारीपासून परावृत्त करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या पहाट योजनेच्या माध्यमातून ते करत आहेत. स्वतः पारधी वस्तीवर जाऊन जेलमध्ये कैदेतून सुटलेल्या गुन्हेगाराचे मानसिक परिवर्तन करुन ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत अशी ग्वाही त्यांच्याकडून घेण्याचे काम ते करीत आहेत.

आदिवासी, पारधी समाजातील व्यक्तींना आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला अशी कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत. अशा वंचित लोकांना शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून दिली. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन विशेष शिबिराचे आयोजन करुन त्यांना लाभ मिळवून दिला. त्यामुळे आदिवासी, पारधी समाजातील हजारो युवक आज गुन्हेगारीपासून परावृत्त होऊन उद्योग, व्यवसायाकडे वळत आहेत.

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना सर्व सहकारी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन ते सातत्याने करत आहेत. याचा पोलीस बांधव, त्यांचे कुटुंबीय आणि सर्वसामान्य जनतेला लाभ व्हावा याकरिता ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अतुल कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक मिळावे अशी आम्हा तमाम धाराशिव वासीयांची अपेक्षा आहे. तरी मा.मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या मागणीचा आणि भावनांचा विचार करुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक प्राप्त व्हावे याकरिता शिफारस करावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.


 
Top