धाराशिव (प्रतिनिधी)-बाळासाहेबांच्या विचार चोरले म्हणून रडगाणे करणाऱ्यांना फक्त बाळासाहेबांची संपत्ती पाहिजे होती विचार नाही. आम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे चालवायचा होता म्हणूनच पक्ष व चिन्ह मिळाल्यानंतरही पक्षाच्या खात्यातील 50 कोटी रूपये त्यांनी आम्हाला मागितले होते. आम्ही लगेच पत्र देवून ते पैसे त्यांना दिले. त्यामुळे आमची संपत्ती म्हणजे बाळासाहेबांचे विचारच आहेत अशी टिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली. 

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात बुधवारी शिवसंकल्प मेळावा दुपारी पार पडला. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. भाषणाच्या प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी 18 व्या शतकात धारासूर राक्षस ऋषीमुनींना त्यावेळेस राक्षस त्रास देत होते. त्यावेळी देवी प्रकटली व तिने त्रास देणाऱ्या राक्षसाचा नाश केला. त्याप्रमाणेच 2024 ला ज्या अपप्रवृत्ती आपल्या त्रास देत होते त्यांना लोकशाही मार्गाने त्यांची जागा दाखवा असे आवाहन शिंदे यांनी केले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या कामाचे कौतुक केले. तर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या दाढीकडे तुमच्या नाड्या आहेत. मला हलक्यात घेऊ नका. दोन वर्षापूर्वी जे झाले ते अवघ्या जगाने पाहिले आहे. मी मर्द आहे, हे सांगण्याची वेळ तुमच्यावर का येते, असा घणाघात केला तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. मुख्यमंत्री शिंदे यांनी 50 आमदार पक्षातून फुटून निघाले. त्यानंतर खोक्याचा आमच्यावर आरोप केला. आम्ही चुकीचे असतो तर जाईल तेथे या प्रमाणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले असते का? असा प्रश्न उपस्थित करून आम्हाला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःचे आत्मपरिक्षण करू पहा असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेतला लगावला.

यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रविंद्र गायकवाड, आनंद जाधव, अनिल खोचरे, ज्योती वाघमारे, अविनाश खापे, प्रा. शिवाजी सावंत, धनंजय सावंत, नितीन लांडगे, दत्ता साळुंके, सुरज साळुंके, ॲड. शिवाजी माने, भारती गायकवाड, अर्चना दराडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मनामध्ये द्वेष

सत्तेला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पुढे काय होईल काही सांगता येत नव्हते. एका शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होवू नये का? हेलीकॅप्टरमध्ये फिरू नये का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त द्वेषच आहे. अडीच वर्षाच्या काळात गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री निधीतून साधे अडीच कोटा रूपये ते देवू शकले नाहीत. आम्ही मात्र वर्षभरात 180 कोटी रूपये जनतेच्या आरोग्यासाठी दिले. कुनबी नोंदी विषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात 18 पगड जातींच्या लोकांसह आपण सुखा समाधानाने राहतो. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठे केले परंतु नेत्यांनी मात्र समाजाला वंचित ठेवले अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. 


पालकमंत्र्यांची टिका

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या भागातील शेतकऱ्यांवर पाण्याचे गाजर दाखवून 1960 पासून अन्याय केला. परंतु आमच्या काळात कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना राबवून पाणी आणण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे. जिल्ह्यातील प्रस्तापित नेत्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढले. कारखान्यातील भंगार विकले. परंतु शेतकऱ्यांचा विचार करून तेरणा कारखाना आपण चालू करण्याचा प्रयत्न केला. लातूर येथील नेत्यांनी अडचणी निर्माण केल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी लातूरच्या नेत्याला सावंत यांच्या वाटेत पाय टाकू नका स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी सर्व केसेस काढून घेतल्या. त्यामुळे आयुष्यभर मुख्यमंत्री शिंदे यांची साथ सोडणार नाही असे तानाजी सावंत यांनी सांगितले. 



 
Top