धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरु केले आहे. आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, मनोजदादांच्या जीवाला धोका झाला तर आम्ही जिजाऊंच्या लेकी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा खणखणीत इशारा दिशा दीपक जाधव हिने शनिवारी (दि.17) दिला.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता आंदोलन सुरु आहे. आंदोलनात तिसऱ्या दिवशी दिशा दीपक जाधव हिने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करुन स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्यातील मराठा समाज आज मागे पडला आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मनोजदादांनी जीवाची बाजी लावून उपोषण आंदोलन सुरु केले आहे. यापूर्वी राणे सरकारने निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण लागू केले. तेच राणे आज आरक्षणाच्या विरोधात बोंब मारत आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही आरक्षण लागू केले, मात्र ते न्यायालयात टिकू शकले नाही. आरक्षण नसल्यामुळे शेकडो मराठा विद्यार्थ्यांनी आपला जीव संपवला. आता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून मनोजदादांनी आरक्षणाचा लढा पुन्हा हाती घेतला आहे. त्यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेण्याच्या मनस्थितीत नाही. मनोज जरांगे यांंच्या जीवाला धोका झाला तर आम्ही जिजाऊंच्या लेकी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आज मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठला आहे. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या-माड्या जाळण्यास मराठा मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top