धाराशिव (प्रतिनिधी)-मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार दिले जातात. 2024 ची साहित्य कलाकृती म्हणून हा पुरस्कार पंडित कांबळे यांच्या 'डॉ. बाबुराव गायकवाड यांचे साहित्य आशय आणि विश्लेषण' या समिक्षा लेखसंग्रहास जाहीर झाला. असे मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी यापूर्वी पत्राने कळविले होते. दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी परिषदेच्या वतीने दुसरे मातंग ऋषी साहित्य संमेलन राजवाडा लॉन्स पिंपरी चिंचवड येथे घेण्यात आले. त्या संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री रमेश पतंगे, शंकर तडाके, निलेश गद्रे, डॉ. धनंजय भिसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन पंडित कांबळे आणि लिना कांबळे यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला.
पंडित कांबळे यांनी धारवाड विद्यापिठातील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. बाबूराव गायकवाड यांच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित, स्वकथन, मुलाखत अशा विविध 15 पुस्तकावरील समिक्षा लेख या पुरस्कार प्राप्त पुस्तकात घेतलेले आहेत. यापूर्वीही या पुस्तकास बीड येथील संस्थेचा मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य पुरस्कारही मिळालेला आहे. पंडित कांबळे हे धाराशिव येथील नगर परिषद शाळा क्र 14 येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे तीन कवितासंग्रह, तीन बालकवितासंग्रह, चार संपादित पुस्तके व एक समिक्षा लेख संग्रह अशे विविध विषयावरील आकरा पुस्तके प्रकाशित आहेत. पंडित कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यीक, मित्र, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.