धाराशिव (प्रतिनिधी) - भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मधील उर्वरित 50 टक्के नुकसान भरपाई रकमेतील रुपये 226 कोटी आजवर शेतकऱ्यांना वितरित केले असून रुपये 6 कोटी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर शासनाकडील बाकी रुपये 50 कोटी पुढील आठवड्यात विमा कंपनीच्या खात्यावर जमा होणार असून उर्वरित सहा मंडळातील शेतकऱ्यांना महिनाअखेर पर्यंत रक्कम मिळावी, यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

खरीप 2022 मध्ये चुकीच्या पद्धतीने 50 % भारांकण लावून शेतकऱ्यांना विमा वितरित करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतल्यानंतर विमा कंपनीने उर्वरित 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. विमा हप्त्यापोटी राज्य सरकारचे रुपये 50 कोटी विमा कंपनीला देणे बाकी असल्यामुळे विमा कंपनीने रुपये 282 कोटी अनुज्ञेय नुकसान भरपाई रकमेतील रुपये 232 कोटी तात्काळ वितरित करण्याचे तर शासनाकडून हप्त्याचे 50 कोटी रुपये मिळाल्यानंतर उर्वरित सहा मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची रक्कम वितरित करण्याचे मान्य केले होते. त्याअनुषंगाने आजवर रुपये 226 कोटी वितरित करण्यात आले असून 6 कोटी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतीय कृषी विमा कंपनीला रुपये 50 कोटी वितरित करण्याची फाईल वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी या फाईलचा दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठवड्यात सदरील रक्कम विमा कंपनीला मिळणे अभिप्रेत असून ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील मोहा, पाडोळी आ. सावरगाव, सलगरा (दि.), अनाळा व सोनारी या सहा मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे.


 
Top