धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा साखर कारखान्यासाठी ढोकीच्या लोकांनी 450 एकर जमीन दिली होती. त्यापैकी 150 ते 200 एकर जमीन रिकामी आहे. या जमिनीवर ढोकींच्या लोकांनी औद्योगिक वसाहत निर्माण करा अशी मागणी केल्यामुळेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्या जमिनीची पाहणी केली. या जमिनी संदर्भात बातम्या आल्यानंतर ॲड. खोत यांनी पत्रकार परिषद घेवून जे आरोप केले ते हास्यस्पद आहेत. ही जमीन एकाद्याच्या घशात जाण्यापेक्षा औद्योगिक वसाहत उभे करणे चांगलेच आहे असे मत तेरणा कारखाना संघर्ष समितीचे सदस्य निहाल काझी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ॲड. अजित खोत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या टिका करताना तेरणा कारखाना सुरळीत चालू असताना कारखान्याच्या जमिनीवर एमआयडीसी उभारण्याची मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार पाटील यांनी केली आहे. या विषयी बोलताना निहाल काझी यांनी तेरणा कारखाना उभारणीसाठी देशमुख, काझी, वाकुरे, पठाण आदींनी जमिनी दिल्या आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी तेरणा साखर कारखान्यात डिस्लरी, इथेनॉल हे उद्योग चालू केले. तर 1250 गाळप क्षमता असताना 7500 गाळप क्षमता वाढविली. 2007 ला कारखान्यात सत्तांतर झाले आणि कारखाना बंद पडला. असे सांगत निहाल काझी यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या सिंचनाच्या कामामुळेच बाहेरून लोक येवून कारखाना चालवत आहेत. त्यामुळे खोत यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत. कारखान्याच्या उर्वरित जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारल्यास अनेकांना रोजगार मिळेल हे खोत यांनी लक्षात घ्यावे. यावेळी भाजपचे आण्णा पवार उपस्थित होते.


 
Top