उमरगा (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपचा जिल्ह्यात प्रवेश झाला. आणि काँग्रेसला ओहोटी लागली. तशा काळातपण माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील हे दोन शिलेदार काँग्रेसचा गड राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. परंतु यापैकी बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

माजी मंत्री बसवराज पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या धाराशिव, लातुर व सोलापूर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांसह नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केद्रीय मंत्री भगवंत खुब्बा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार सुधाकर शिनगारे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रमेश कराड, रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात मंगळवारी (दि.27) मुंबई येथील भाजपा कार्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील, शिरीष उटगे, बी. व्ही. मोतीपवळे, कॉग्रेसचे प्रदेश सचिव बसवराज धाराशिवे, संगमेश्वर ठेसे, विठ्ठलराव बदोले, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, योगेश राठोड, लातुर जिल्हा उपाध्यक्ष हणमंत राचट्टे,  प्रणिल उटगे, गौस शेख, यशपाल कांबळे, सुरज बाभळसुरे, सचिन पाटील, रफिक तांबोळी, प्रल्हाद काळे आदीसह धाराशिव व लातूर जिल्हयातील कॉग्रेसचे, युवक काँग्रेसचे व विविध सेलच्या शेकडो पदाधिकाऱ्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 


 
Top