धाराशिव (प्रतिनिधी) -मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज, अभ्यासू नेतृत्व, पँथर यशपाल प्रल्हादराव सरवदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मरणिका प्रकाशन व अभिवादन सभा सोमवार, 26 फेबु्वारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

धाराशिव येथील यशपाल सरवदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात मोठे योगदान दिले होते. कणखर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची राज्यात ख्याती होती. धाराशिव नगरपालिकेेचे उपनगराध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. बौध्द धम्म चळवळीमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग होता. त्यांनी आपल्या हयातीत केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेली स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. स्मरणिका प्रकाशन व अभिवादन सभेस केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत ज. वि. पवार, दलीत पँथरचे संस्थापक सदस्य अविनाश महातेकर, ज्येष्ठ नेते अर्जून डांगळे, ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, ज्येष्ठ विचारवंत सुरेश वाघमारे, कमलाकर कांबळे, ॲड. राज कुलकर्णी, कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पिंपळदरी येथे बुध्दमूर्ती स्थापना व पँथर यशपाल सरवदे यांच्या स्मारकास अभिवादन पूज्य भन्ते धम्मसार, मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार आहे. गौतमबुध्द यांची मूर्ती ज्येष्ठ उपासक कैलास शिंदे यांनी दान दिलेली आहे. तर स्मरणिकेचे प्रकाशन व अभिवादन सभा दुपारी 2 वाजता शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्मृतिग्रंथ प्रकाशन समितीच्यावतीने अध्यक्ष नागबोधी रिसर्च सेंटर सुषमा यशपाल सरवदे, उपाध्यक्ष अरूण बनसोडे, सचिव ॲड. सुदेश माळाळे, कोषाध्यक्ष एम. डी. जानराव, सदस्य प्रेरणा संगारे, सुनील बनसोडे, दीपक डावरे, चेतन शिंदे, पृथ्वीराज चिलवंत, सोनिया डांगे, प्रसेनजित सरवदे यांनी केले आहे.


 
Top