तुळजापूर (प्रतिनिधी) -  संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी मागील पाच दिवसापासुन बसलेल्या पंकज संतोष बोबडे यांच्या उपोषणास दिवसेंदिवस मोठा पाठींबा मिळत आहे. महिलांचा सहभाग या आंदोलनात वाढल्याने हे आंदोलन घरोघर गावोगाव पोहचत आहे. पंकज बोबडे यांच्या उपोषण स्थळास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भेट देवून पाठिंबा व्यक्त केला आहे.

संघर्ष योध्दा मनोज जरांगेची प्रकृती जसजसी ढासळत आहे. तसतसा वातावरणात तणाव वाढत आहे. मनोज जरांगे आंदोलन समर्थनार्थ तुळजापूर बंद मिळालेला प्रतिसाद हा प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरणारा आहे. सध्या मराठा आरक्षण आंदोलन धग शहरात आहे. ती ग्रामीण भागात पसरण्यास वेळ लागणार नाही. आजपर्यत पाच हजार विविध जातीधर्माचा मंडळीनी उपोषण स्थळी भेट देवुन पाठींबा दिला आहे. यात पाचशे महिलांनी या आंदोलनात  प्रत्यक्ष एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन पाठींबा दिला. महाराष्ट्र शासनाने तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. तसेच शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, ग्रामीण भागातील जवळपास पंचवीस गावातील सकल मराठा समाज बांधवांनी उपोषण स्थळी भेट देवुन पाठींबा दिला. तसेच मुस्लीम, बंजारा समाज, पञकार संघ सह विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला. या आंदोलनाचा शेवट लवकर होणे गरजेचे आहे अन्यथा तालुक्यात याचे लोण पसरले तर प्रशासनासाठी व तिर्थक्षेञ तुळजापूरच्या शांततेते साठी डोकेदुखी ठरणार आहे.


 
Top