भूम (प्रतिनिधी)-भूम शहर व तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह दिवसभर पहायला मिळाला. ईट, पाथरूड, वालवड व माणकेश्वर या गावात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी भूम शहरातील माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली सर्वधर्मीय सार्वजनिक शिवजयंती या उपक्रमात भूम येथील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. गोलाई चौक भूम याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की, या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने व डॉल्बीमुक्त साजरा करणे आवश्यक आहे. यापुढे डॉल्बीमुक्त सण साजरे करण्याची गरज आहे. यानंतर भूम पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज असल्याचे म्हंटले. शिवजयंतीनिमित्त जमा झालेल्या देणगीतून वाचनालयात पुस्तके भेट देणे गरजेचे आहे ज्या मधून शिवरायांचे विचार सर्वांना आत्मसात करता येतील असे यावेळी बोलताना ते म्हणाले. यावेळी साहिल गाढवे, माजी नगरसेवक सागर टकले, संजय पवार, उद्योजक संजय साबळे, जेष्ठ पत्रकार दिनेश पोरे, पत्रकार धनंजय शेटे, पत्रकार अब्बास सय्यद, वस्ताद बुबुकर जमादार व शहरातील सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी माळी यांनी केले. कार्यक्रमानंतर तरुणांनी बाईक रॅली काढली.


 
Top