धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन धाराशिवच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव येथील श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. महानाट्याच्या प्रयोगाच्या आज 18 फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी  धाराशिवनगरी शिवगर्जनेने दुमदुमली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य बघण्याचा योग शिवगर्जना महानाट्याच्या माध्यमातून “याची देही याची डोळा “आला. महानाट्यातील कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण,उत्तम वेशभूषा,सुसंगत प्रकाश योजना व सजावट उपस्थित रसिकांकडून महानाट्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या जयघोषाने क्रीडा संकुलाचे वातावरण शिवमय झाले होते.

शिवगर्जना या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विनायक चौगुले यांनी खूप प्रभावीपणे साकारली आहे,मा जिजाऊंची भूमिका दिपाली हांडे,बालशिवाजीच्या भूमिकेत सुरज कोळी,शहाजी महाराजांच्या भूमीकेत सुहास चौगुले तर अफजलखानाची भूमिका शकील पटेल यांनी साकारली आहे. दि. 18 फेब्रुवारी  रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते या महानाट्यचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शस्त्र पूजन केले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपसथिती होती.या महानाट्यला धाराशिव जिल्ह्यातील हजारो नागरिकांची उपस्थित होते.


 
Top