धाराशिव (प्रतिनिधी)- कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या प्रक्रियेला गती येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोलमेज बैठकीमध्ये अनेक उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे. 

या बैठकीमध्ये बॉम्बे टेक्स्टाईल रिसर्च, सुदर्शन फॅब्रिक्स, रेल्वे, मे. ॲडवांटेज स्पोर्ट्स, मे. श्रेयस एंटरप्राइजेस अँड स्टार कॉटन, बिर्ला सेल्युलेस इंडस्ट्रीज, जेआयएसएल यासारख्या नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधीसह वस्त्रोद्योग व उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. मराठवाड्याचा समावेश उद्योग विभागाच्या झोन 2 मध्ये असल्याने तसेच धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असल्याने उद्योजकांना येथे आकर्षित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध सवलती व विशेष सूट दिली जात आहे. या ठिकाणी जमीन, पाणी, वीज व दळणवळणाच्या पर्याप्त साधनांसह कमी खर्चात मनुष्यबळाची देखील उपलब्धता असल्याने येथे नवीन उद्योग सुरू करण्यास पूरक वातावरण आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मध्ये रोजगार निर्मितीला मोठा वाव असल्याने शासनाकडून विशेष सवलती दिल्या जात असून 30 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील दिले जाते. 


असे असेल टेक्स्टाईल पार्क

कौडगाव औद्योगिक क्षेत्र आराखड्यात टेक्निकल टेक्स्टाईल पार्क साठी 90.20 हेक्टर क्षेत्रामध्ये लहान मोठ्या आकाराचे 72 भूखंड व सीईटीपी, सीएफसी, पोलीस स्टेशन व फायर स्टेशन साठी चार भूखंड राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सदरील बैठकीस केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, आमदार राणाजगजितसिंह पाटील, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, सहआयुक्त एस. पी. वर्मा, संचालक एस. के सिंग, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भांमरे, यांच्यासह उद्योजक महेश कावरी, उदय खाडीलकर, रितेश भारंबे, तानाजी कदम, धीरज कोंदरे, ऋषिकेश कोंदरे, अंकित राठोड, जय राणे, किशोर हिंदोचा, यांच्यासह स्थानिक उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 
Top