धाराशिव (प्रतिनिधी)- वर्ल्ड कॉम्प्युटर दिनानिमित्त, येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागाने  आपले सामाजिक भान जपत, शाळेमध्ये कॉम्प्युटर साक्षरतेचे वर्ग घेतले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि कॉम्प्युटर इंजीनियरिंग  या विभागाच्या  विभाग प्रमुख प्रा.सुजाता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वर्ल्ड कॉम्प्युटर डे च्या निमित्ताने धाराशिव शहराच्या जवळच असलेल्या शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान दिले.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, संपूर्ण जग हे संगणक जग झाल्यामुळे अगदी प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना संगणकाविषयी माहिती असणे गरजेचे आहे .एकदा माहिती झाली की विद्यार्थ्यांना या विषयात गोडी आपोआप निर्माण होते. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमच्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची आखणी केली होती. त्यानुसार शहरापासून जवळच असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे आमच्या विद्यार्थ्यांनी दिले.या मुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासा , संगणकाला हात लावून पाहण्याची इच्छा पूर्ण झाली  व  आजच्या या प्रोग्रामिंग व कोडींगच्या जगामध्ये भविष्यात शालेय विद्यार्थ्यांना कोडींग मध्ये सुद्धा प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.यावेळी बोलताना विभाग प्रमुख प्रा.सुजाता गायकवाड म्हणाल्या की मुलांनी उत्स्फूर्तपणे हे काम केल्यामुळे आपल्याला विशेष आनंद होत आहे. आणि यानिमित्त विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपण्याचे  अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलेले आहे.

शालेय स्तरावर संगणक साक्षरता या मोहिमेमध्ये संगणक शाखेचे सय्यद दिलदार, साळुंखे प्रिया, सोहेल पठाण ,रोहिणी पांढरे, अपेक्षा गडकर, ऋतुजा शिंदे यांनी विशेष प्रयत्न करून शाळेतील मुलांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आणि नवीन मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथील शिक्षकांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबत शंभरहून अधिक  प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान दिले. त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने संगणक प्रशिक्षण देण्यामध्ये विद्यार्थी यशस्वी झाले.


 
Top