धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून दररोज खून, बलात्कार, सशस्त्र दरोड्यासह पोलिसावरही हल्ले वाढले आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी चक्क पोलीस ठाण्यातच बंदुकीचा वापर केला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केलेले आहेत. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढल्यामुळेच राज्यामध्ये गुंडगिरी व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रशासकीय यंत्रणेवर कसलेही नियंत्रण राहिले नसल्यामुळेच लोकात कायद्याची भीतीच उरली नाही. महाराष्ट्राची स्थिती बिहारपेक्षाही गंभीर झाली असून येथे जंगलराज सुरू आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अँड रेवण भोसले यांनी केली आहे.

 भाजप -शिवसेना -राष्ट्रवादीच्या जनविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होत असून सर्वसामान्य जनता व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात जनतेचे रक्षण करणारे शेकडो पोलिसावर हल्ले झाले असून राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्याच्या प्रमाणात वाढत होत आहे. भाजपेतर राज्यांमध्ये कुठे खट्ट झाले तरी महायुतीतील सर्व नेते एका सुरात तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात आणि त्या राज्यात जंगल राज असल्याची बोंब ठोकतात .मग आता हे महायुतीचे नेते महाराष्ट्रात मूग गिळून का गप्प बसले आहेत ?ज्या राज्यात पोलीसच सुरक्षित नाहीत तेथे जनसामान्यांचा वाली कोण? त्यातच  आ. नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले आम्ही काही केले तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही. अशा या चिथावणीखोर आमदारावर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक का केली नाही?  प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील तर मग नोकरशाहीवर  कोण नियंत्रण ठेवणार? एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे तक्रार आहे की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीमुळे आम्हाला दैनंदिन काम करणे अवघड झाले आहे. सर्वच  आघाड्यावर अपयशी ठरलेली महायुतीची राजवट ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखीच वागत असून स्वातंत्र्य, समता, बंधुता , सहिष्णुता. न्याय इ. मूल्य धुळीस मिळवून राज्यघटना मोडीत काढण्याचा विषारी प्रयोग करत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळांबरोबरच रस्त्यावरही सत्ताधाऱ्यांमध्ये टोळी युद्ध सुरू झाले आहे .पोलीस ठाण्यामध्ये अशाप्रकारे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असेही ऍड भोसले यांनी म्हटले आहे.


 
Top