धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्तवतीने आता सुधारित तारखेला म्हणजे 19 ते 21 फेब्रुवारी 2024 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “ शिवगर्जना “ या महानाट्याचे आयोजन पोलीस परेड ग्राउंड,धाराशिव येथे सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार आहे.     

“ शिवगर्जना “ महानाट्याच्या आयोजनाच्या तारखा यापूर्वी 17 ते 19 फेब्रुवारी 2024 अशा निश्चित करण्यात आल्या होत्या.आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनापासून म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून महानाट्याची सुरुवात होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी कळविले आहे.

“शिवगर्जना “महानाट्याची प्रेक्षक क्षमता 8 ते 10 हजार इतकी आहे.फिरता 65 फुटी भव्य रंगमंचावर 300 कलावंत हे महानाट्य सादर करणार आहे.यामध्ये हत्ती, घोडे,उंट व बैलगाडी देखील असणार आहे.या महानाट्यामध्ये चित्तथरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग,एक धगधगत्या इतिहासाची आठवण,नेत्र सुखद अतीषबाजी,खराखुरा निखळ इतिहास,मंत्रमुग्ध संगीत,नेत्रदीपक प्रकाश योजना,आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड घातलेली पाहायला मिळणार आहे.

या महानाट्यमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण,विजयनगरचे साम्राज्य,लखोजी राजाची हत्या, शिवजन्म,युद्ध कला व राज्यकारभाराचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ,अफजलखानाचा वध, पन्हाळगड वेढा,पावनखिंडीतील शौर्यगाथा,शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लूट,कोकण मोहीम,पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य,आग्रा भेट,तानाजी मालुसरेचे बलिदान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हे प्रसंग या महानाट्यातून बघायला मिळणार आहे.तरी प्रेक्षकांनी महानाट्याच्या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


 
Top