धाराशिव (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जनसंवाद यात्रा करणार आहेत. या यात्रेत ते पाच ठिकाणी जाहिर सभाव्दारे जनतेस संवाद साधणार आहे.
उध्दव ठाकरे हे दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12 वाजता पोहोचणार आहेत. त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालय, तुळजापूर मोड येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर लामजना, किल्लारी मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता उमरगा येथे दत्त मंदिर समोर गुंजोटी कॉर्नर येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ. आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार आहे. त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर शिंगोली व्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे. दिनांक17 फेब्रुवारी रोजी शिंगोली व्ही.आय.पी. गेस्ट हाऊस येथून आळणी फाटा, ढोकी मार्गे कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील होळकर चौक येथे 11 वाजता सभा आहे. त्यानंतर कळंबहून येरमाळा, बार्शी बायपास मार्गे परंडाकडे प्रवास करणार आहेत. परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून सोनारीकडे प्रवास करणार आहेत. सोनारी येथे भैरवनाथचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर अनाळा, वालवड मार्गे भूमकडे प्रवास करणार आहेत. भूम येथे 5 वाजता ओंकार चौक नगरपालिकेच्या समोर सभा आहे व सभा संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणार आहेत. त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याचे जोरदार नियोजन करण्यात येत आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा गट) तयारील लागला आहे.