धाराशिव (प्रतिनिधी) -शेतीला पूरक धंदा न शोधता शेती हाच पूरक व्यवसाय म्हणून करावा. शेतीची प्रगती करायची असेल तर कृषि क्षेत्राचा स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा, असे मत अहंमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण, किसान वाचनालय व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील पळसप येथील स्व. वसंतराव काळे साहित्य नगरीत शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी  9 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात 'कृषि व कृषिपूरक व्यवसाय - काळाची गरज' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय भामरे, हिंगोली येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे, स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. पाटील म्हणले, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करून घ्यावे. मग पीक कोणते घ्यावे याचाही विचार करावा. तुषार सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल. शेतीला रानटी जनावरांचा मोठा त्रास होत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुंपण करायला अनुदान मिळाले पाहिजे. फळ शेती करत असताना त्याचा शेतकऱ्यांनी सर्वंकष अभ्यास करावा. शेती नफ्यात आणायची असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. विजय भामरे म्हणाले की, आजची शेती व्यावसायिक होऊ लागली आहे. 63 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. 46 टक्के रोजगार निर्मिती ही शेतीतुन होते. त्यामुळे 51 टक्के लोक शेतीवरच अवलंबून आहेत. कधी कधी कमी काळात जास्त पाऊस पडतो. परिणामी पिकांचे नुकसान होऊन शेती तोट्यात जाते. म्हणून शेतीसोबत पूरक व्यवसाय करून पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधावेत. पशुपालन करून दूध व्यवसाय चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते, असेही ते म्हणाले.

प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी शेतीपूरक दूध व्यवसाय हा चांगला पर्याय असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात दूध उप्त्पादनामुळे धवल क्रांती घडून आली असल्याचे ते म्हणाले. भारतीय शेती ही जननी आहे. परंतु आपण जननीकडे दुर्लक्ष करत आहोत. शेती परवडत नाही म्हणून शेती बंद पडत नाही. सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल, अशी मांडणी त्यांनी केली.

डॉ. अशोक ढवण यांनी शेतीशी निगडित पूरक उद्योग निवडावे असे सांगून शेतीकडे उद्योग म्हणून पाहावे, असे मत व्यक्त केले. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळत नाही, हे देखील शेती व्यवसाय तोट्यात जाण्याचे कारण आहे. कृषि महाविद्यालयात मुलींचे प्रमाण वाढत असल्याची बाब समाधानकारक आहे. असेही ते म्हणाले. परिसंवादाचे सूत्रसंचालन कल्याण देशमुख यांनी केले. आभारप्रदर्शन बालाजी तांबे यांनी केले. कार्यक्रमास  मराठवाड्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top