धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर रेल्वे संघर्ष समितीने तुळजापूर तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांची बैठक रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात बाधीत शेतकऱ्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करुन संघर्षला बळ दिल्याबद्दल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांचा या बैठकीत सत्कार करण्यात आला.

या बैठकीमध्ये प्रमुख तीन ठराव घेण्यात आले. रेल्वे बाधित शेतकऱ्यांना जो काय तुटपुंजा मावेजा दिला जात आहे. तो मावेचा एकही रेल्वे बाधित शेतकरी उचलणार नाही. रेल्वे बाधित धाराशिव जिल्ह्यामधील जे काही 24 गावचे भूसंपादन झाले आहे. त्या 24 गावांमध्ये लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाणार आहे. लवकरच धाराशिव-तुळजापूर संघर्ष समिती रेल्वे बाधित शेतकऱ्यांना घेऊन जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांना योग्य मावेजा मिळत नाही तोपर्यंत रेल रोको आंदोलन करणार आहे.

या बैठकीमध्ये धाराशिव तुळजापूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, अँड. गणेश पाटील दहिवडीकर यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना मयूर बाळासाहेब पेंदे यांनी तर आभार मयूर लसणे यांनी मानले. तसेच या बैठकीला उपस्थित शेतकरी शंभूराजे पेंदे, प्रवीण राजे कदम,पद्मराज गडदे, अँड. राखेलकर, अपसिंगेकर, काकासाहेब ननवरे, सोमनाथ शिरसागर, सुदर्शन झाडपिडे, महेश जाधव, पाटील, तसेच धाराशिव तालुका व तुळजापूर तालुक्यातील रेल्वे बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top