धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या पहिल्या बैठकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत सविस्तर माहिती देवून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मजबूत केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, नितीन बागल, किशोर साठे, ॲड. यादव, ॲड. सावळे, अतुल जगताप आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीच्या बैठकीनंतर चर्चा झाली आहे. त्यांनी मतदारसंघात फिरण्याचे आदेश आपल्याला दिले आहेत असे सांगितले. पुढे बोलताना सुरेश बिराजदार म्हणाले की, मी जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक येथे काम केल्यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता माझीशी जोडलेला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे मंत्री आहेत. परंतु त्या ठिकाणची जागा महायुतीमध्ये भाजपला सुटणार आहे. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा बिराजदार यांनी व्यक्त केली. यापूर्वी उमरगा विधानसभा मतदारसंघात दोन वेळेस आमदार की निवडणूक लढविण्याची संधी आली होती. परंतु काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकुरकर यांनी शरद पवार यांच्याशी बोलून ही जागा काँग्रेसला सोडली. बंडखोरी करण्याचा गुण आमच्यात नाही. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आपल्या कारकिर्दीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, किल्लारी सहकारी साखर कारखाना, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हे सुस्थितीत आणण्याचा आपण प्रयत्न केला. त्यात यश पण मिळाले असे बिराजदार यांनी सांगितले. मी आजपर्यंत सामान्य लोकांच्या मदतीला धावून गेलो आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली तर महायुतीचा विजय निश्चित आहे असा दावाही सुरेश बिराजदार यांनी केला.