भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील देवळाली येथील शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बाजीराव तांबे यांच्या खून खटल्यातील  आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विश्वास माने यांनी हा निकाल सुनावल्यानची माहिती सरकारी वकील प्रवीण माने यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील देवळाली येथे 26 मे 2020 रोजी शिवसेनेचे तत्कालीन व सदस्य बाजीराव तांबे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर जात होते. यावेळी आरोपी चंद्रकांत तांबे व इतर आरोपींनी बाजीराव तांबे यांना अडवले. यावेळी देवळाली ते वंजारवाडी जाणाऱ्या शेत रस्त्याच्या कामावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून व जुगार अड्ड्यावर धाड टाकायला लावल्याच्या संशयातून आरोपी चंद्रकांत तांबे याने बाजीराव यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये बाजीराव तांबे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मताचे भाऊ अंकुश कल्याण तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परांडा पोलीस ठाण्यात चंद्रकांत रावसाहेब तांबे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. सय्यद व अंमलदार सय्यद यांनी या प्रकाराचा तपास करून आरोपी विरुद्ध भूम सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

साक्ष, पुराव्यानंतर समोर आलेली बाजू, वैद्यकीय अहवाल, प्रयोगशाळा यांचा अहवाल ग्राह्य धरून आरोपी चंद्रकांत तांबे यास न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. गाडे यांनी भक्कम बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार बाजीराव बळे यांनी काम पाहिले.


 
Top