धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने घेतलेल्या तपासणी शिबिरामध्ये पात्र लाभार्थींना कृत्रिम अवयव व आवश्यक सहाय्यक उपकरणे वितरित करण्यासाठी दि. 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्तीकरिता सहायय्क उपकरणे (ADIP) व राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत वृध्दांना आवश्यक ती उपकरणे देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2022 ते 21 ऑगस्ट 2022 दरम्यान तालुका निहाय तपासणी व मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना यापूर्वीच कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात आली आहेत, तर राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपकरणे वितरीत करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO)  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

या अनुषंगाने दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासून वृध्दांना सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात येणार असून चार दिवस या वितरण शिबीराचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. दि.15 फेब्रुवारी रोजी उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातील लाभार्थ्यांकरिता नळदुर्ग येथे, दि.16 फेब्रुवारी रोजी धाराशिव व कळंब तालुक्यातील लाभार्थ्यांकरिता धाराशिव येथे, दि.17 फेब्रुवारी रोजी भूम व वाशी तालुक्यातील लाभार्थ्यांकरिता वाशी येथे तर दि.18 फेब्रुवारी रोजी परंडा तालुक्यातील लाभार्थ्यांकरिता परंडा येथे साहित्य वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 707 लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब समाजातील सर्व घटकांना लाभ मिळावा यासाठी प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करत आहेत, त्याबद्दल त्यांचे व सदरील उपकरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्यासह अलिम्को चे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आभार व्यक्त केले आहेत.


 
Top