धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे यांना 6 लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शिंदे यांना न्यायालयात हजर केले असता 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. 

3 कोटी 88 लाखांच्या कामापैकी थकलेले 1 कोटी 88 लाखांचे बील मंजुरीसाठी शिंदे याने 10 लाख रूपये लाच मागितले होती. तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित तुळजाभवानी सैनिक विद्यालयाच्या प्रशासकीय इमारत तसेच संरक्षक भिंतीच्या कामाचे देयक काढण्यासाठी 10 लाख रूपये लाचेच्या मागणीमध्ये तडजोडीअंती लेखाधिकारी शिंदे यांनी 6 लाख रूपये पंचासमक्ष स्विकारताना लाचलुचपत विभागाने शिंदे यांना ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे पोलिस अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपाधिक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशिष पाटील यांनी कारवाई केली.

6 लाख रोख 27 तोळे जप्त

एसीबीच्या पथकाने शिंदे यांच्या घराची झडती घेतल्यानंतर 6 लाख 8 हजार रूपये रोख सापडले. तर 27 तोळे सोन्याचे दागदागिने सापडले. सिध्देश्वर शिंदे यास 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.


 
Top