धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता असणारे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प महायुती सरकारमुळे निर्णायक टप्प्यात आहेत. आणखी नवे महत्वाचे प्रकल्प जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट निश्चित करुन,रोजगारनिर्मिती सह जिल्ह्याच्या विकासाचे घटक ठरवून त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यासाठी एक सजग जिल्हावासीय म्हणून सर्वांचा सहभागही महत्वपूर्ण आहे. त्यासाठीच सामूहिक हिताच्या सूचना, महत्वाचे प्रश्न, अडचणी यावर साधकबाधक चर्चा करण्याकरिता 174 कोटींच्या कामांना जोडून  जिल्हा विकासाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कौडगाव एमआयडीसीतील तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प, श्री तुळजाभवानी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा हे प्रकल्प मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. या व्यतिरिक्त नियोजित सूरत-चेन्नई महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग तसेच विविध प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा अधिक वापर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, अशा विविध पातळ्यांवर सध्या वेगाने काम सुरू आहे.जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीसाठी व रोजगारनिर्मितीसाठी नाविन्यपूर्ण आणि जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी विचारविनिमय व मंथन आवश्यक आहे. त्यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांसह उद्योजक व विविध क्षेत्रातील तज्ञांनीही उपस्थित राहून आपल्या अनमोल सूचना मांडाव्यात, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.


 
Top