धाराशिव (प्रतिनिधी)-मागील 5 वर्षात धाराशिव शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त झालेल्या धाराशिव शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील 9 मी. व त्यापुढील रुंदीच्या 25 किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग या शहरांतील रस्त्यांच्या सुधारणे करिता मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने रस्ते व नाली विकासासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एप्रील 2023 मध्ये देण्यात आल्या होत्या. याबाबत धाराशिव आणि कळंब येथे पत्रकार परिषद घेवून नागरिकांना माहितीही दिली होती.

धाराशिव शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी 154 कोटींचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. तुळजापूरसाठी 173 तर नळदुर्ग शहराकरिता 104 कोटींचा आराखडा देण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात तुळजापूरसाठी 139 कोटी तर नळदुर्गसाठी 97 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली, तर धाराशिव व कळंब शहराचा विषय प्रलंबित राहिला होता. आता धाराशिव शहरासाठी रु. 140 कोटी निधी मंजूर झाला असून कळंब च्या प्रस्तावास देखील लवकरच मंजूरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

जानेवारी 2024 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निधीची मागणी केली. त्यांच्या विशेष सहकार्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवसाठी 140 कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यामुळे शहरवासीयांची गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top