उमरगा (प्रतिनिधी)- मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली आहे. शासकीय हमी दरापेक्षा 3 हजार 501 रुपये जादा म्हणजे 10 हजार 501 रुपये उच्चांकी दर मिळत आहे. तर हारभ-यालाही हमीभावापेक्षा 1160 रुपये जादा म्हणजे 6 हजार 600 रुपये दर मिळत आहे. तुरीची प्रतिदिन 1500 क्विंटलपेक्षा जास्त आवक होत आहे. उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तुरीबरोबरच हारभ-याची आवकही वाढली असुन बाजार समितीचा परीसर गजबजून दिसत आहे.
मुरुम कृषी उत्पन्न समितीत वर्षानुवर्षे शेतमालाचे लिलाव व वजन शेतकऱ्यांसमक्ष केले जाते. शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार शेतमालाची खरेदी विक्री केली जाते. यामुळे उमरगा, लोहारा, अक्कलकोट तालुक्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील अनेक गावातुन शेतीमाल विक्रीसाठी मुरुम बाजार समितीमध्ये येतो. मुरुम बाजार समितीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. गेली चार वर्षे शासकीय हमीभावापेक्षा बाजारपेठेत शेतमालाच्या किमती कमी असल्याने हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला होता. जिल्हयातील नामांकित असलेल्या व सर्वाधिक उलाढाल असलेल्या मुरुम बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन प्रयोग राबवले जातात. यामध्ये शेतमालाचे लिलाव व वजन शेतकऱ्यांसमक्ष केले जात असून शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार शेतमालाची खरेदी विक्री करणे, बाजार समितीने बाजार आवारात कडता, मात्रे, आडत बंद करुन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारे वजन करुन रोख पट्टी देण्यात येत आहे. या वर्षी तुर व हारभ-याला उच्चांकी दर मिळत आहे. यामुळे प्रतिदिन दिड हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक येत आहे. उच्चप्रतीच्या तुरीला हमी भावापेक्षा 3 हजार 501 रुपये जादा म्हणजे 10 हजार 501 रुपये जिल्ह्यात उच्चांकी दर मिळत आहे. तर हारभ-यालाही हमीभावापेक्षा 1160 रुपये जादा म्हणजे 6 हजार 600 रुपये दर मिळाल्याने तुरीसह हारभ-याची आवक वाढली असुन बाजार समितीचा परीसर गजबजून दिसत आहे. शेतीमालाला योग्य दर मिळत शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.
स्पर्धेच्या युगात बाजार समिती टिकवून ठेवण्याबरोबरच शेतमालाला योग्य भाव देत शेतकऱ्यांना न्याय देण्यास प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांचा विश्वास हेच आमचे यश आहे. मुरुम बाजार समितीत शेतीमालाची आवक वाढली असुन नविन व्यापा-यांनी खरेदी सुरू केली आहे. यामुळे तुरीला व हरभ-याला शासकीय हमीभावापेक्षा जादा म्हणजे जिल्ह्यत उच्चांकी दर मिळत आहे. परिणामी बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. सध्याच्या उच्चांकी दराचा शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती बापुराव पाटील यांनी केले आहे.