धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळ, नापिकी, गारपीट, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत असताना व रोजच सीमेवर जवान शहीद होत असताना मोदी सरकार राम मंदिरासारखे धार्मिक मुद्दे उपस्थित करून आनंदोत्सव साजरा करत असून देशातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, बेरोजगार तरुणांची क्रूर थट्टाच करीत असल्याचे टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.
शेतीमालाला हमीभाव व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या निवडणूक पूर्व आश्वासनाला हरताळ फसला आहे. विदेशातील काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणे ,पाच कोटी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणे तसेच भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद ,नक्षलवाद नष्ट करणे इ. आश्वासनांची गेल्या साडेचार वर्षात पूर्तता करण्यास मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे .मोदी सरकारने स्टार्टअप, स्टँड अप, मेक इन इंडिया, स्किल इंडिया ,डिजिटल इंडिया, शायनिंग इंडिया यासारखे इंग्रजी गोंडस नावे असणाऱ्या योजनांची स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केली आहे .तसेच नोटबंदी व कॅशलेस व्यवहाराचाही पूर्णपणे फज्जा उडाला आहे .पेट्रोल, डिझेल तसेच रेल्वे व बसच्या दरात गेल्या साडेचार वर्षात प्रचंड वाढ करून सामान्य जनतेसाठी प्रवास महाग केला आहे .जगात महासत्ता होण्याचे स्वप्न रंगवणारे मोदी सरकार राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 2.5 टक्के शिक्षणावर खर्च करते तर सार्वजनिक आरोग्यावर 2 टक्के तरतूद केली जाते . एकीकडे देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात शिक्षणासाठी किमान 15% तरतुदीची मागणी केली होती तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या गोंडस नावाखाली शिक्षणाचा खेळखंडोबा करणारी धोरण आखत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण -रोजगाराचा कसलाही ताळमेळ नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांची ससेहोलपट सुरू आहे .मनरेगा, शेतकरी ,वंचित, गरीब घटकासाठी योजनावर अनुदान म्हणून भरघोस तरतूद केली जात नाही .मोदी सरकारने मराठा ,धनगर, लिंगायत, मुस्लिम ,जाट ,गुजर ,पटेल आदी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून समाजाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. मोदी सरकार गेल्या साडेचार वर्षात सर्व स्तरावर अपयशी ठरले असून देशातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त करून व्यापारी व भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवीत आहे .त्यामुळे आता मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून विदेशातील काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणे तसेच पाच कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर देशातील जनता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मत ॲड. भोसले यांनी व्यक्त केले आहे.