धाराशिव (प्रतिनिधी)-खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचा नाम उल्लेख न करता भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून अर्धवट माहितीद्वारे चमकेगिरी करण्यासाठी काहीही बोलतात अशी टिका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेवून राक्षसी, महत्वकांक्षी प्रेरीत होवून पत्रकार परिषदत आरोप केल्याचे त्यांनी सांगितले. एकंदर धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे संपादित जमिनीच्या मावेजाबाबत धांदात खोटी माहिती विरोधी पक्षाचे नेते पसरवित आहेत. अशा अर्धवटरांच्या टिकेला आपण महत्व देत नाही अशी घणाघाती टिका आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. आमदार पाटील यांनी सोलापूर-धाराशिव रेल्वेच्या भूसंपादनाबाबत जमिनीची आधारभूत किंमत ठरविणे आवश्यक आहे. त्याच मुद्यावर सर्व शेतकऱ्यांना संघटीत करून न्यायालयात दाद मागितली जाणार आहे असे सांगितले होते. यावर ठाकरे शिवसेना गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सडकून टिका केली आहे. राज्यात सर्वत्र रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करताना वाटाघाटीने भूसंपादन केले जाते. धाराशिव जिल्ह्यात मात्र सक्तीने भूसंपादन केले जाते आणि सत्ताधारी आमदार म्हणतात आपण न्यायालयात दाद मागू. न्यायालयाचे निकाल येण्यास 20 वर्षे लागतात. तो पर्यंत लोक देशोधडीला लागतात. असे सांगून सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन करताना वाटाघाटीने 15 लाख रूपये एकर ने भूसंपादन केले गेले. आज रेल्वे विभाग 9 लाख रूपये एकर ने सक्तीने भूसंपादन करत आहे. विशेष म्हणजे जास्त मुल्यांकन असलेले 40 व्यवहार मात्र वगळले गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे माथे भडकविण्याचे आमचे काम नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम शेतकऱ्यांच्या मनावर होत आहे. असे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी सांगून सत्ताधारी आमदार लोकांना मुर्खात काढत आहेत अशी टिकाही राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.