नळदुर्ग (प्रतिनिधी)- येळकोट, येळकोट जय मल्हारचा गजर व लाखो भाविकांच्या उपस्थितीत नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबा यात्रेस दि.25 जानेवारी रोजी मोठया उत्साहात प्रारंभ झाला.25 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असुन यादिवशी जवळपास 800 ते 900 मानाच्या काठ्यांसह मंदिर परीसरात लाखो भाविक उपस्थित होते. नळदुर्ग नगरपालिका, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने यात्रेकरूंची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षीची पाणी टंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने भाविक व यात्रेकरूंना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. दि.26 जानेवारी रोजी नळदुर्ग (मैलारपुर) येथे भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबाचे ठिकाण खंडोबा भक्तांसाठी अतीशय महत्त्वाचे ठिकाण आहे कारण याच नळदुर्गच्या पवित्र भुमीत श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह झाला आहे. त्याचबरोबर खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असल्याने बाराही महिने श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी श्री खंडोबाची यात्रा दि.24,25 व 26 जानेवारी 2024 रोजी भरत आहे. यात्रेचा मुख्य दिवस 25 जानेवारी हा आहे. यादिवशी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्यांतील लाखो भाविक मैलारपुरात येतात. मात्र यावर्षी दुष्काळी परीस्थिती तसेच पाणीटंचाई असल्याने दरवर्षीपेक्षा भाविकांची संख्या यावर्षी कमी दिसुन येत होती.

येळकोट, येळकोट जय मल्हार चा प्रचंड गजर, खोबरे भंडाऱ्याची मोठया प्रमाणात उधळण व हालगीच्या तालावर नाचणारे वारू यामुळे मंदीर परीसरात उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर वाघ्या–मुरळीचे मंदीर परीसरात सुरू असलेले ठसकेबाज बहारदार गाणे यामुळे मंदीर परीसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दि.25 जानेवारी रोजी पहाटेपासुनच श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच, लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी देवाला दंडवत घालणे, देवाला नैवेद्य दाखविणे, लंगर तोडणे, वारू जेऊ घालणे,तळी उचलणे यासह विविध धार्मिक कार्यक्रम मंदीर परीसरात दिवसभर सुरू होते. दुपारपर्यंत मंदिर परीसरात जवळपास 800 ते 900 मानाच्या देवाच्या काठ्या दाखल झाल्या होत्या. देवाची काठी वाजत, गाजत मंदिर परीसरात आल्यानंतर ती प्रथम जुन्या मंदिराला वळसा घालुन नवीन मंदिराकडे येते. यावेळी हालगीच्यावतालावर वारू बेधुंद होऊन नाचत होते. यावेळी भाविकांकडुन मोठ्याप्रमाणात देवाच्या काठ्यांवर खोबरे व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

मंदिर परीसरात भाविकांच्या सोईसाठी आरोग्य विभागाने दवाखाना सुरू केला होता. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व सिस्टर रुग्णांवर उपचार करत होते. मंदिर परीसरात यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी पाळणाघर, मौत का कुंआ विविध खेळणीचे दुकाने, मुर्त्यांची दुकाने, हॉटेल व प्रसादाची दुकाने मोठ्याप्रमाणात थाटली होती. राज्य परीवहन महामंडळाने बसस्थानक ते मंदिरापर्यंत भाविकांना जाण्यासाठी बस गाड्यांची सोय केली होती. यावेळी महामंडळाने 50 बसगाड्या सुरू केल्या होत्या. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी यात्रेचे योग्य नियोजन करून यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे यात्रेत किरकोळ दारू विक्री वगळता एकही अवैध धंदा सुरू नव्हता. अतीशय तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये 9 पोलिस अधिकारी,70 पोलिस कर्मचारी व 50 गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश होता.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी यात्रेचे अतीशय चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. यात्रेकरूंच्या सेवेसाठी, स्वच्छता, वीज व पिण्याच्या पाण्याची अतीशय चांगल्या प्रकारची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. यामुळे पाणीटंचाई असुनही यात्रेकरूंना पाण्याची कमतरता जाणवली नाही. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यासह नगरपालिकेचे 90 कर्मचारी याठिकाणी काम करीत होते. रुग्णवाहिका तसेच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्याही याठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या त्याचबरोबर नगरपालिकेने यात्रेकरूंच्या सोईसाठी मंदिर परीसरात विविध ठिकाणी फिरत्या स्वच्छता गृहांची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीनेही याठिकाणी आपले महावितरणचे एक अधिकारी व 6 कर्मचारी सज्ज ठेवले होते.खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही भाविकांसाठी दर्शन रांगेसह इतर सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

दि.26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. खंडोबा यात्रेनिमित्त श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती नळदुर्गच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेमध्ये जास्तीतजास्त पैलवानांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर यांनी केले आहे.
 
Top