भूम (प्रतिनिधी) - शाकंभरी पौर्णिमा निमित्त येथे आयोजित चौंडेश्वरी देवी महोत्सवात गुरूवार दि 25 रोजी शहरातून  शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी 18 जानेवारी ते 25 जानेवारी या सात दिवसाच्या कालावधीत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ.प. तुकाराम मेहुणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. 

सदरील शोभायात्रेत सर्व कोष्टी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी शोभायात्रेचा प्रारंभ चौंडेश्वरी देवीची पालखीसह सकाळी वरद विनायक मंदिरातून झाला. शोभायात्रेत कलशधारी महिला यांनी सहभाग घेतला. हिरवा मारुती मंदिर, शेंडगे गल्ली, गांधी चौक, चौंडेश्वरी मंदिर, नगरपरिषद चौक, लक्ष्मी रोड, गोलाई चौक, परंडा रोड मार्गे ही शोभायात्रा परत वरदविनायक मंदिर परिसरात विसावली. शोभायात्रेनंतर चौंडेश्वरी देवीची महाआरती झाली. यानंतर चौंडेश्वरी तरुण व एकता मंडळाच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा व 1 मिनिट स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसांचे वाटप डॉ.राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

सप्ताहदरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार यांचे कार्यक्रम पार पडले. यावेळी भूम शहरात कोष्टी बांधवांची विविध प्रकारची दुकाने बंद असल्याने गुरुवार आठवडी बाजाराचा दिवस असून, देखील शहरातील व्यापारपेठेत अघोषित शांतता होती. सदरील कार्यक्रमास कोष्टी समाजातील ज्येष्ठ यांनी मार्गदर्शन केले तर तरुणांनी अथक परिश्रम घेतले.


 
Top