तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या सांस्कृतिक केंद्रात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्रमुख व्याख्यात्या प्रा. सौ. शुध्दमती फुलसागर, माजी मराठी विभाग प्रमुख रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांनी वरील प्रतिपादन केले.
पुढे त्या म्हणाल्या की, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मराठी भाषिक लोक कॉन्व्हेन्टच्या पाशात अडकून लहान मुलांचे खरे बालपण चिरडून टाकत आहेत. मराठी आज वैश्वीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची ज्ञानदानाची भूमिका निभावून एकीकडे ज्ञानदानाची प्रक्रिया पूर्ण करत आहे तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीचे आकलन करून उच्चवर्ग भाषेचे दुसरे टोक गाठत आहे. मुलं अनुकरणातून भाषा आत्मसात करतात म्हणजेच ते अनुकरणातून ज्ञानाचेही आकलन करत असतात. कांही काळानंतर व्याकरणाच्या माध्यमातून मुलांना भाषा प्रयोगाचे ज्ञान प्राप्त होते. मध्यकालीन संत साहित्यामधून संत ज्ञानेश्वरांनी,संत तुकारामांनी मातृभाषेतून समाज जागृती केली. याचा असाही अर्थ होतो की, जागृत होणं म्हणजे ज्ञानवंत होणं होय. मग आधुनिक काळात परकीय भाषेतून शिक्षण घेऊन आपण नेमकं साध्य काय करत आहोत. जिथे मातृभाषा नाही तिथे संवेदनशीलता हरवत जाते, आणि जिथे ज्या समाजात संवेदनशीलता नसते तिथे समाज हा बेभान व प्रवाहहीन होत जातो. माणसाचं माणूसपण जर जिवंत ठेवायचे असेल तर मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावे लागेल असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव ऋडोके म्हणाले की, मानसिक विकासासाठी मातृभाषा आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात जरी आपण प्रवेश केला असला तरी माणूसपण जिवंत रहाणे गरजेचे आहे. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी म्हणूनच ज्ञान ,विज्ञानाबरोबरच संस्कारांचे विचार समाजात रुजविली. आणखी भविष्यात हजारो वर्षे हे विचार माणसाला माणसात ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरतील असे अनमोल विचार डॉ. डोके यांनी मांडले. यावेळी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त महाविद्यालयात तुतारी भित्तीपत्रका देखील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. तुतारी अंकासाठी कु.रंजना कांबळे, बी.ए.भाग 3, कुमारी प्रतिक्षा सिध्दगणेश यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोकडे यांनी केले तर आभार प्रा. श्रीमती मगरे एम. एन., मराठी विभाग कनिष्ठ विभाग यांनी मानले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.