धाराशिव (प्रतिनिधी)- धावता सर्वच विद्यार्थ्यांना येते पण धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊ क्रमांक मिळवता आला पाहिजे. तसे अभ्यास करत शालेय क्रीडा व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत यश मिळविले तर तुमच्या सारख्या गुणवंत विद्यार्थ्यांतून देशाला उच्च दर्जाचे अधिकारी मिळतात असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जेटनुरे यांनी बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील जयंती निमित्त आयोजित विद्यार्थी पारितोषक वितरण कार्यक्रम प्रसंगी जेटनुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाई धनंजय पाटील हे होते. प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू गिरजाप्पा दहिहंडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो - खो खेळाडू रोहिणी आवारे, प्राचार्य पी. एन. पाटील, उपप्राचार्य एन. एम. देटे, राज्य आदर्श क्रीडा पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. एम. देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे. खेळामुळे व्यसनापासून दूर राहता येते असे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो खो खेळाडू रोहिणी आवारे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले.

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन व भाई उद्धवराव पाटील जयंती सोहळा निमित्त घेण्यात आलेल्या विविध शालेय स्तरावरील कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेतील विजेते विद्यार्थी, बारावी विज्ञान व कला बोर्ड परीक्षेतील गुणवंत, एन.एम. एम. एस. परीक्षा, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, स्काऊट गाईड राज्य पुरस्कार, राष्ट्रीय बाल विज्ञान राज्य पुरस्कार अशा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रासह पारितोषक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. एन. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन अमोल दिक्षीत व आनंद वीर यांनी केले. आभार पर्यवेक्षक व्ही.के. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज

विद्यार्थी आज अभ्यासा बरोबरच खेळामधील विविध स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. राज्य आणि देशपातळीवर खेळाडू घडविण्यासाठी खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या शाळेतून असे असंख्य खेळाडू घडत आहेत. असे राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाई धनंजय पाटील यांनी बोलताना सांगितले.


आरोग्य हीच संपत्ती

विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करावा. खेळामुळे व्यायाम होतो. खेळण्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते असे नाही तर शारीरिक स्वास्थ्या बरोबरच मानसिक स्वास्थ्य ही निरोगी राहते. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागण्यासाठी खेळाचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो. आरोग्य हीच संपत्ती आहे असे राज्य आदर्श क्रीडा पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. एम. देशमुख यांनी आपल्या सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले.


 
Top