धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या कांद्याचे, सोयाबीनचे, कापसाचे, तुरीचे व इतर पिकांचे भाव हे सरकार सातत्याने पाडण्याचे काम करीत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. विशेष म्हणजे आयात धोरण राबवून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर तर सोडाच किमान लागवड खर्च देखील निघत नाही. उद्योगपतींना कर्जमाफी तर शेतकरी वाऱ्यावर ही सरकारची निती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी नारा कर्जमुक्त सातबारा कोरा हे अभियान राज्यभरात सुरू केले आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत इंगोले बोलत होते. पुढे बोलताना इंगोले म्हणाले की, कांदा, सोयाबीन, कापूस व इतर पिकांच्या बाबतीत होत असून, सरकारने भाव पाडल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. एकीकडे शेतकरी विरोधी धोरण घ्यायचे तर दुसरीकडे उद्योगपती असलेल्या मेहुल चोकसी या उद्योगपतीच्या गीतांजली प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 5 हजार 452 कोटी रुपये व निरव मोदी यांच्या हिऱ्याच्या कंपनीला 68 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष इंगळे यांनी शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमाफी अर्ज ऑनलाईन भरून घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विष्णू काळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष नेताजी जमदाडे, गुरुदास भोजने, चंद्रकांत समुद्रे, कमलाकर पवार, विजय सिरसाट, अभय साळुंके, उत्तरेश्वर आवाड, बाळासाहेब मडके आदी उपस्थित होते.