तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रच्या शैक्षणिक क्षेत्राचा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी योग्य न्याय निवाडा केला असे उद्गार माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी काढले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या सांस्कृतिक केंद्रात विवेकानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यातच संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचा दुग्ध शर्करा योग साधत महाविद्यालयात 'ज्ञानशिदोरी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी पुढे चव्हाण म्हणाले की, बापूजी खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षणमहर्षी आहेत. आजचे शिक्षणमहर्षी त्याग करताना दिसत नाहीत, कारण बापूजींच्या मनात शेतकऱ्यांच्या मुलांकरिता प्रचंड तळमळ जाणवत होती, तशी चर्चा देखील आमदार मधुकरराव चव्हाण आणि बापूजींच्या मध्ये प्रत्येक भेटीत होत असत. बापूजींची मराठवाड्यात येण्याची खूप योग्य वेळ होती. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी मनापासून स्वीकारला होता. त्यांनी विद्येची देवता सरस्वतीची सतत पूजा केली. पैशाची देवता लक्ष्मीची पूजा त्यांनी कधींही केली नाही. सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन नेतृत्व तयार होईल हा विचार बापूजींनी महाराष्ट्राला दिला. शिक्षणातून शेती करण्याचा संदेश महाराष्ट्राला बापूजींनी दिला याचे कारण हेच होते की, भविष्यात एकाच परिवारात शेती करणाऱ्यांची संख्या जास्त होईल याची जाणीव त्यांना होती. ही दूरदृष्टी फक्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडेच होती याची जाणीव महाराष्ट्राने ठेवण्याची गरज आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या उपदेशांमुळे माझी राजकीय कारकीर्द उजळली गेली. बापूजींच्या पावलांवर पाऊल टाकून आज अभयकुमारजींचे शैक्षणिक कार्य चालू आहे ही बाब अतिशय आनंददायी असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. धनंजय लोंढे यांच्या पुढाकारातून तुळजापूर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व प्राध्यापकांना शैक्षणिक कार्याबद्दल गौरवपत्र व 'हिमछाया प्रतिष्ठान'च्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच 'ज्ञानशिदोरी' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ग्रंथ ही भेट स्वरूपात देण्यात आले. ग्रंथपाल प्रा. दीपक निकाळजे यांच्या पुढाकारातून प्रभारी प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी गौरवपत्राचे वाचन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या विकास समिती सदस्य प्रा.ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.जे. कुकडे यांनी केले व प्रास्ताविक प्रा व्ही.एच. चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाचे आभार डॉ. सी. आर. दापके यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय समापन प्रभारी प्राचार्य मेजर प्रो. डॉ. डोके यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top