तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रगल्भ बुध्दीने घेतलेले निर्णय ध्येयापासून वंचित होऊ देणार नाहीत असे प्रतिपादन न. प. धाराशिवचे माजी नगराधयक्ष नानासाहेब पाटील यांनी केले. तुळजापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे दि.12 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत विवेकानंद सप्ताह आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना नानासाहेब पाटील म्हणाले की, हैदराबाद संस्थानात मराठवाडा क्षेत्र असताना आपल्याकडील शिक्षणाची टक्केवारी केवळ चार टक्के इतकीच होती. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या कार्य कतृत्वाच्या बळावरच ही टक्केवारी अधिक प्रमाणात वाढत गेली अन्यथा मराठवाडा भाग पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागास राहिला असता. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित होण्याची गरज त्यावेळी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ओळखली होती. ज्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी दिवे देखील लागत नव्हते तिथे डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानाच्या मशाली पेटवून अज्ञानाच्या अंध:कारत खितपत पडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले.कष्टाचाच दुसरा उपाय म्हणजे यश आहे. तरुणांनी कष्टाचा काळ वाया न घालवता यशाकडे वाटचाल करावी असा संदेश त्यांनी शेवटी दिला.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ. प्रो. यशवंतराव डोके, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. आनंद मुळे तसेच विद्यार्थी पालक व मातांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.एम. कदम यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. धनंजय लोंढे यांनी केले. आभार प्रा. जे. बी. क्षीरसागर यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीं तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.