धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा 2011 पासून देशभरात 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .
लोकशाही स्थापन होणाऱ्या शासनात प्रत्येक नागरिकास सहभाग असावा यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकास मत देण्याचा अमूल्य अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत 14 वा राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त दिनांक 25 जानेवारी, 2024 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव या महाविद्यालयास जास्तीत जास्त मतदान नोंदणी करून राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग होऊन लोकशाहीला बलशाही बनवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रा.प्रमोद तांबारे यांची उपस्थिती होती. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून मतदार नोंदणी केल्याबद्दल प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने व या उपक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि विश्वस्त मल्हार पाटील व ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी अभिनंदन केले.