धाराशिव (प्रतिनिधी)-शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्हा नियोजन समिती निधीमधून खरेदी केलेल्या अनियमितते बाबत जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्यावतीने जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्हा नियोजन समिती मधील खरेदी केलेल्या सण 2023 मध्ये इंटर ऍक्टिव्ह बोर्ड खरेदीमध्ये प्रचंड गैरव्यवहार असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने तक्रार अशी आहे की, सदरचा बोर्ड खरेदी करताना शाळेला त्याची गरज होती काय? तसेच शाळेकडून मागणी पत्र प्राप्त केलेले होते काय? याची खातरजमा न करता सुमारे चार कोटी रुपयाचे शंभर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड खरेदी करून प्रत्येकी किंमत चार लाख प्रमाणे बाजारभावापेक्षा चढ्या दराने खरेदी केल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये सद्यस्थितीला लाईटची सुविधा नाही, स्वच्छता गृह नाही, पिण्याचे पाणी नाही, इमारती मोडकळीस आलेल्या आहेत अशी परिस्थिती असताना शासनाची चार कोटी रुपये नाहक वाया गेल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आपण स्वतः सदरील खरेदी प्रक्रियेमधील जिल्हा परिषदेच्या आवश्यक त्या मान्यता, शासनाच्या मान्यता, खरेदी करावयाच्या बोर्डाचे आवश्यक निकष,सदरील निकष निविदाद्वारे प्रसिद्ध केले होते काय? अथवा  पोर्टल वर प्रसिद्ध केले होते काय? सदरचा बोर्ड हा मागणी किंवा दर पत्रकानुसार पुरवला गेला होता काय? एकूण किती निविदा प्राप्त होत्या? निविदा प्राप्त होण्यासाठी किती अवधी दिला होता? तसेच जे सॉफ्टवेअर खरेदी केले आहेत ते पुरविले आहे काय? याची खातरजमा केली आहे काय? शाळांची मागणी होती काय? या शाळांमध्ये पूर्वी अशी सुविधा पुरवली होती काय? या शाळांमधून विद्युत सुविधा आहे काय? विद्यार्थी संख्या पुरेशी आहे काय? या सर्व बाबी तपासल्या होत्या काय? याची चौकशी होणे आवश्यक आहे. सुमारे चार लाख रुपयांना एक बोर्ड ही बाब प्रचलित बाजार भावापेक्षा आवाजवी  असल्याचे निदर्शनास येते त्यामुळे हा बोर्ड कोणत्या कंपनीचा आहे? आणखीन अशा कोणत्या कंपन्यांचे बोर्ड बाजारात उपलब्ध आहेत व त्यांचे तुलनात्मक दर काय आहेत हे केवळ चार प्राप्त निवेदावरून पडताळणी करणे हा सुद्धा गैरव्यवहारच वाटतो. त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन दोषी कर्मचारी, अधिकारी विरुद्ध कार्यवाही करावी तसेच आम्हाला आणखीन असे समजते की आणखीन असे खरेदीचे प्रकार शिक्षण विभागात होणार आहेत त्यामुळे प्रत्येक प्रस्तावाची तपासणी आपल्या स्तरावरून काटेकोरपणे होऊन जनतेचा पैसा वाया जाणार नाही याची आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

वरील सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषी कर्मचारी अधिकारी विरुद्ध कार्यवाही करावी अशी या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा महेंद्र काका धुरगुडे यांच्यासोबत भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव तालुका अध्यक्ष प्रशांत फंड,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, परंडा तालुका सरपंच संघटना अध्यक्ष रवींद्र नलावडे, धर्मराज गटकळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top